छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी प्रक्रियेला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांच्या माध्यमातून ही खरेदी केली जाणार असून, यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने या हंगामासाठी हरभऱ्याचा हमीभाव ५८७५ रुपये प्रतिक्विटल निश्चित केला आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला हरभरा हमीभावाने विकायचा आहे, त्यांनी १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष हरभरा खरेदी ही १ मार्चपासून सुरू झाली असून, ती २९ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने ९ प्रमुख केंद्रांना मंजुरी दिली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण तालुक्यांचा समावेश आहे.
-- शेतकऱ्यांना आवाहन --
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने विक्री न करता, शासनाच्या या पोर्टलवर विहित मुदतीत नोंदणी करावी आणि हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यू. राठोड यांनी केले आहे.













